Facial Hair Removal: चेहऱ्यावर शेव्हिंग करत असाल तर महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा...

Image credit: pexels

बहुतेक मुली आणि महिला चेहऱ्यावरील केस असण्याच्या समस्येने त्रस्त असतात. सर्वांसमोर लाजेची धन नको म्हणून फेशियल हेयर रिमूव्ह करण्याचे अनेक उपाय त्या करतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी मुली रेझर, वॅक्स, थ्रेडींग असे अनेक उपाय करतात. चेहऱ्यावरील केस काढल्याने चेहरा चमकदार आणि मऊ होतो, ज्यामुळे मेकअप व्यवस्थित लावता येतो आणि जास्त काळ टिकतो. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी रेझर वापरणे एक जलद उपाय आहे. मात्र, योग्य माहितीशिवाय रेझर वापरणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. 

Also Read: Self Care: एक दिवस स्वतःसाठी! जाणून घ्या सेल्फ केयरसाठी काही मॉडर्न उपाय

अनेकदा खूप घाईने किंवा चुकीच्या पद्धतीने शेव्हिंग केल्याने त्वचेवर पुरळ, जखमा, मुरुमे, जळजळ आणि कोरडेपणा यांसारख्या समस्या होऊ शकतात. ज्यामुळे चेहरा पूर्वीपेक्षा अधिक खराब दिसू शकतो. त्यामुळे, कोणतेही उत्पादन किंवा साधन विचारपूर्वक वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, चेहऱ्यावर शेविंग करताना कोणती काळजी घ्यावी... 

image credit: istock

स्वच्छ आणि योग्य रेझरचा वापर करा. 

चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे तिला विशेष काळजीची गरज असते. जर तुम्ही चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी रेझर वापरत असाल, तर जुने किंवा खराब झालेले रेझर वापरणे टाळा. नेहमी स्वच्छ आणि धारदार पात्याचे रेझर निवडा. घाणेरड्या किंवा जास्त वापरलेल्या पात्यांमुळे त्वचेवरील जीवाणू वाढू शकतात, ज्यामुळे मुरुमे/ जंतुसंसर्ग होऊ शकतो.

ड्राय शेविंग करणे टाळा. 

अनेक महिला चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी थेट चेहऱ्यावर रेझर वापरतात. ही एक मोठी चूक आहे. कोणतेही क्रीम, जेल किंवा मॉइश्चरायझर न लावता थेट चेहऱ्यावर शेविंग केल्याने त्वचेला इजा होऊ शकते. शेविंग करण्यापूर्वी, आपला चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि हलके जेल किंवा कोरफड लावा. यामुळे रेझर सहजतेने फिरण्यास मदत होईल आणि कापण्याचा किंवा जळजळ होण्याचा धोका कमी होईल.

image credit: istock 

शेविंगनंतर मॉइश्चराइजर लावा. 

शेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर काहीही लावणे टाळावे, कारण शेविंगनंतर चेहरा अधिकच संवेदनशील होतो. चेहऱ्याला मॉइश्चर करण्यासाठी कोरफडीचा गर लावावा. यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि कोरडेपणा दूर होतो.

जर तुम्हाला मुरुमे किंवा पुरळ असतील तर काय करावे? 

ज्या लोकांना आधीच मुरुमे, जखमा किंवा पुरळ आहेत, त्यांनी चेहरा शेव्ह करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मुरुमांवर रेझर फिरवल्याने त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते आणि व्रण निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. 

सतत शेव्हिंग करणे टाळा.

एक दिवसाआड शेव्हिंग केल्याने त्वचा कमकुवत आणि संवेदनशील होऊ शकते. जास्त शेव्हिंग केल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. म्हणून, तुमच्या त्वचेच्या गरजेनुसारच शेव्हिंग करा.