जाणून घ्या, स्नानाच्या विविध पद्धती आणि स्नान करण्याची योग्य प्रक्रिया...

 


  शरीर स्वच्छ करण्यासाठी आपण सकाळी नियमितपणे अंघोळ करतो. स्नान करून फक्त शरीर स्वच्छ होत नाही तर मानसिकदृष्ट्या देखील आपल्याला ताजेतवाणे  वाटते. म्हणूनच दिवसभराचा शीण काढण्यासाठी काही लोक संध्याकाळी देखील अंघोळ करतात. स्नानाने शरीर रोगमुक्त व तणावमुक्त होतो. पण तुम्हाला स्नानाच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल आणि योग्य प्रक्रियेबद्दल माहिती आहे का? नाही ना... चला तर मग करूयात थोडा परिचय स्नानाच्या विविध पद्धतींबरोबर...

१. वायू स्नान: सकाळी ताज्या हवेत फिरल्याने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. सकाळची ताजी हवा आरोग्यदायी असते. आयुर्वेदानुसार सूर्योदयाच्या वेळी हवा स्वच्छ आणि प्रसन्न असते. त्यामुळे शरीरामध्ये तेज, बळ, स्फूर्ती आणि उत्साह येतो. 

२.  सूर्य स्नान: यासाठी सूर्याची कोवळी किरणे अंगावर घ्यायला हवीत. उगवत्या सूर्याच्या किरणांमुळे आरोग्य सुधारते. सूर्यस्नान करतेवेळी सैल आणि पातळ कपडे घालावेत. सूर्यस्नान करण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन अवश्य लावा. 

३. कटी स्नान: एका टबमध्ये कोमट तर दुसऱ्या टबमध्ये थंड पाणी घ्या. प्रथम कोमट पाण्यात कमरेचा खालचा भाग बुडवून घ्या. ५ ते १० मिनिटांनी गरम पाण्यतून उठून थंड पाण्यात बसा.  यामुळे चरबी कमी होते. ज्यांचे नितंब  मोठे असतात त्यांच्यासाठी कटिस्नान फायदेशीर असते. या प्रकारच्या स्नानामुळे नितंब, मांड्या आणि जांघेवरील चरबी कमी होते. 

४. बाष्प स्नान: एखाद्या बंद खोलीमध्ये गरम पाण्याची वाफ घ्या. वाफ घेतल्याने त्वचेवरील रोमछिद्र खुलतात. मृतपेशी दूर होतात. घामावाटे टॉक्सिन बाहेर पडतात. ५-७ मिनिट वाफ घेऊन कोमट पाण्याने स्नान करा. 

५. गुलाब स्नान: अंघोळीच्या पाण्यात गुलाबाचा अर्क किंवा तेल मिसळा व त्याने स्नान करा. गुलाबाच्या सुगंधामूळे तुमचं शरीर सुगंधी आणि प्रफुल्लित होईल. 


६. तेल स्नान: या प्रकारच्या स्नानात अंघोळीच्या पाण्यात सुगंधी तेल मिसळतात. ज्यामुळे स्नानासोबतच पूर्ण शरीराला तेलमालिश होते. यामुळे तुमची त्वचा कोमल व सुंदर बनते. 

७. लवण स्नान: एका टबमध्ये कोमट पाणी घ्या व त्यात एक चमचा मीठ मिसळा. आता या पाण्यात थोडावेळ बसा, नंतर साध्या पाण्याने अंघोळ करा. या स्नान प्रकारामुळे कोरडी त्वचा मुलायम बनते आणि अंगदुखी दूर होते. 

८. वालुका/ मृत्तिका स्नान: या स्नानाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे समुद्राच्या वाळूमध्ये किंवा मातीचा लेप लावून स्नान करणे. वालुका- स्नानामध्ये समुद्रात अंघोळ केल्यावर त्या व्यक्तीला किनाऱ्यावर झोपवून गळ्यापर्यंत पूर्ण शरीर वाळूने झाकल्या जाते. गरजेनुसार एक ते दीड तास या स्थितीमध्ये ठेवल्यावर पुन्हा समुद्रस्नान करवतात. 

 मृत्तिका स्नानामध्ये बारीक वाटलेल्या मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर, गुलाबजल आणि सुगंधी तेल मिसळून पेस्ट बनवतात. या पेस्टचा पूर्ण शरीरावर लेप लावा. सुकल्यावर कोमट पाण्याने स्नान करा. या प्रकारचे स्नान त्वचारोगावर उपयुक्त ठरते. 

स्नान करण्याची योग्य प्रक्रिया : 

- अंघोळ करताना प्रथम डोक्यावर पाणी घ्या. नंतर खांदे, पोट, कंबर आणि पायांवर पाणी घ्या. 

- स्नानापूर्वी केलेलं थोडस तेलमालिश किंवा प्राणायाम खूप फायदेशीर असतो. 

- उटण्यांचा लेप किंवा फळाच्या गरांचा वापर स्नानासाठी केल्यास त्वचेवरील मृतपेशी दूर होतात. 

- पाण्यामध्ये एक कप मिल्क पावडर मिसळल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. 

    






  





  


Previous Post Next Post