मैत्रिणींनो! नैसर्गिक सौंदर्य मिळवण्यासाठी 'या' औषधी वनस्पती आहेत लाभदायक...


आयुर्वेदिक उपचारांमध्ये औषधी वनस्पतींची पानं, फुलं, मुळ्या, साल यांचा वापर केला जातो. प्राचीन काळापासूनच औषधोपचारांसाठी, सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी, आयुर्वेदाचा वापर केला जातो. आजही औषधांमध्ये आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये या वनस्पतींचा वापर केला जातो. नैसर्गिक औषधींचा महत्त्वाचा लाभ म्हणजे त्या समस्येचं मुळापासून निराकरण करतात, तसेच याचे साईड इफेक्ट्स होण्याचे प्रमाणदेखील नगण्य आहेत. नैसर्गिक सौंदर्य हे मेकअपपेक्षा निरोगी त्वचा आणि केस यांमुळे अधिक खुलतं. 

निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या या औषधी वनस्पतींमध्ये त्वचा आणि केसांशी निगडित समस्यांचं निराकरण करण्याची अद्भुत शक्ती आहे. उदा. तेलकट आणि रोगयुक्त त्वचेसाठी जी  प्रसाधने बनवली जातात, त्यांमध्ये चंदन, लवंग, निलगिरी, हळद, कापूर, लिंबू, पुदिना इ. गोष्टी वापरल्या जातात. चला तर अशाच काही औषधींची माहिती घेऊयात... 

कॅमोमाइल

ही एक औषधी वेल असून यामध्ये हानिकारक घटक जवळजवळ नसतातच. हिच्यापासून मिळणारे तेल अत्यंत हलके असते. या तेलाचा उपयोग बऱ्याचशा सौंदर्यप्रसाधनांमध्ये करतात. कॅमोमाइल तेलाचा उपयोग भाजलेल्या जखमा बऱ्या  करण्यासाठी देखील करतात. 

चंदन

भारतामध्ये चंदन हे सर्वाधिक लोकप्रिय प्रसाधन आहे. आपल्याकडे तर चंदनाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही. आयुर्वेदानुसार चंदन हे त्वचा आणि सौंदर्य दोन्हीचं रक्षण करतो. भाजलेल्या आणि कापलेल्या खुणा नाहीशा करण्यासाठी त्यावर चंदनाचा लेप लावतात. 

चंदन शीतल गुणधर्माचे असून तो शरीराला थंडावा प्रदान करतो. भारतात चंदनाचे दोन प्रकार आढळून येतात- पांढर चंदन आणि रक्तचंदन,  दोन्हीही औषधी प्रकार आहेत. चंदनयुक्त क्रीममुळे त्वचेचे प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण होतं. चंदनाच्या तेलाचा उपयोग अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये करतात. 

गुलाब 

गुलाबापासून मिळणारा अर्क हा अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. मनमोहक सुगंधामुळे गुलाब खूप लोकप्रिय बनला आहे. गुलाबजल किंवा गुलाबाच्या अर्काचा उपयोग अरोमाथेरेपीमध्ये करतात. परफ्युम बनवण्यासाठी गुलाबाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. 

गुलाबाच्या सुगंधामुळे शरीराचा थकवा दूर होतो आणि मन प्रफुल्लित होते. त्याप्रमाणे गुलाब सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. याच्या वापरामुळे त्वचा नैसर्गिकरित्या गुलाबी बनते, त्वचेची जळजळ आणि खाज दूर होते, गुलाबाच्या अर्कामध्ये बुडवलेल्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचा थकवा दूर होतो आणि जळजळ कमी होते. 

चंदनाप्रमाणे गुलाबामध्ये देखील शीतल गुणधर्म आहेत, म्हणूनच गुलाबापासून तयार होणाऱ्या गुलकंदामुळे  उष्णता  कमी होते. 

कोरफड 

सूर्याची अतिनील किरणं, प्रदूषण यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि त्यावर सुरकुत्या येतात. अशा निस्तेज त्वचेला तजेलदार बनवण्याचे काम कोरफड करतो. कोरफडीपासून मिळणाऱ्या गराच्या नियमित सेवनानं शरीरातील अशुद्धी दूर होते, उष्णता व पित्त कमी होते, त्वचा तजेलदार होते. 

कोरफड हा मॉइश्चरायझरमध्ये वापरला जाणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. कोरफडीमुळं पेशींची पुनर्निर्मिती होते. कोरफडीपासून तयार होणाऱ्या जेलचा वापर क्लींजरमध्ये करतात. 

हळद 

हळदीच्या नियमित सेवनाने रक्तशुद्धी होते. हळद ही एक नैसर्गिक ब्लिच असून तिच्या नियमित सेवनाने त्वचा उजळते. हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्याने कापलेल्या जखमेवर शुद्ध हळद लावतात. त्वचेवर लावण्यात येणारे फेसपॅक हळदीशिवाय परिपूर्ण होत नाही. बऱ्याच सौंदर्यप्रसाधनांमध्ये साबण किंवा फेसवॉशमध्ये हळदीचा वापर केला जातो.    


Previous Post Next Post