गळ्याची शोभा वाढविणाऱ्या 'या' पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ...


 केसांपासून पायापर्यंत जरी विविध दागिने घातले जात असले तरी गळ्यात घातल्या जाणाऱ्या दागिन्यांचं महत्त्व काही औरच आहे. दागिन्यांच्या खरेदीची सुरुवात नेकलेस आणि त्याला साजेशा कानातल्यांपासून होते. पण नेकलेसची निवड आपल्या पोशाखाला आणि शरीरयष्टीला साजेशी हवी. बसकी मान असणाऱ्या लोकांनी गळ्यात घट्ट बसणारे दागिने न घालता लांबीला थोडे जास्त असणारे दागिने घालावेत. सावळा किंवा काळा वर्ण असणाऱ्यांनी खड्यांचे दागिने शक्यतो घालू नयेत. त्याऐवजी मोती आणि सोन्याचे दागिने त्यांच्या रंगावर गोऱ्या रंगापेक्षा जास्त खुलून दिसतात. नाजूक चण असणाऱ्या लोकांनी भरगच्च दागिने घालू नयेत. अशाच काही मनमोहक गळ्यात घातल्या जाणाऱ्या दागिन्यांची माहिती घेऊयात.. 

कोल्हापुरी साज


कोल्हापुरी साज म्हणजे पारंपरिक पद्धतीचे मंगळसूत्र होय. कोल्हापूरचे स्थानिक लोक हा साज मोठ्या प्रमाणात घडवत असल्याने त्याला कोल्हापुरी साज असं म्हणतात. साज बनवण्यासाठी चंद्र, शंख, नाग, कमळ, कासव अशी पदकं समोरासमोर तारेने जोडलेली असतात. मध्यभागी छोटं पेंडंट असतं; ज्याला 'पानडी' असे देखील म्हणतात. पूर्वी हा साज संपूर्ण सोन्यात बनवला जायचा. आता त्यात काळे मणी पण वापरले जातात. 

 पुतळी हार


गोल चपट्या नाण्यांप्रमाणे असणारे शिक्के एकत्र गुंफून जी माळ बनवतात तिला पुतळी हार म्हणतात. या शिक्क्यांवर देवी देवतांची चित्रं असतात. पूर्वी सोनं, चांदी किंवा पितळेच्या पुतळ्या बनवत असत. 

वज्रटीक
 

हा एक खूप जुना दागिना असून जोंधळे मणी एकत्र गुंफून वज्रटीक बनवतात. यामध्ये बेलपान वज्रटीक नावाचा एक प्रकार  असतो. बेलाच्या पानाच्या आकाराची सोन्याची पानं एकत्र करून हा वज्रटीक बनवतात. 

तन्मणी
 

तन्मणी हा देखील खास महाराष्ट्रीयन दागिना आहे. हा गळ्याबरोबर बसणार नेकलेसचा प्रकार आहे. जो मोत्यांपासून बनवलेला असतो. तन्मणी बनवण्यासाठी पिवळसर रंगाच्या मोत्यांच्या ३-४ माळ एका पेंडंटसोबत एकत्र गुंफलेल्या असतात. या पेंडंटला 'तन्मणीचं खोड' असं म्हणतात. हे खोड हिरे, माणिक आणि पाचू वापरून बनवतात. पेशवेकालीन स्त्रियांमध्ये हा दागिना खूप प्रसिद्ध होता. आजकाल नऊवारी साडी नेसल्यावर तन्मणी  आवर्जून घातला जातो. 

मोहनमाळ
 

मोहनमाळ बनवण्यासाठी आपल्या खाण्याच्या मिरीच्या आकाराचे सोन्याचे मणी वापरले जातात. हे मणी एकत्र गुंफून त्याची माळ बनवतात. मोहनमाळ दोन पदरी ते पाच पदरी असते. 

चिंचपेटी
 

हा गळ्यासरशी बसणाऱ्या आभूषणाचा प्रकार आहे. चिंचपेटी बनवण्यासाठी सोन्याच्या पोकळ चपट्या आणि आयताकार पेट्या एकत्र गुंफतात. आयताकार दिसणाऱ्या या पेट्यांवर नक्षीकाम केलेले असते. या पेट्यांची एकापुढे एक रचना करून चिंचपेटी बनवतात. सोन्याच्या चिंचपेटीप्रमाणे मोत्याची चिंचपेटीदेखील बनवली जाते. टपोरे मोती एकापुढे एक गुंफून मोत्यांची चिंचपेटी बनवतात. या चिंचपेटीला खाली मोत्याचे लटकन जोडलेले असतात. नाजूक चणीच्या स्त्रीला मोत्याची, तर आडवा बांधा असणाऱ्यांना सोन्याची चिंचपेटी शोभून दिसते. 

ठुशी 


पूर्वीच्या राजघराण्यातील स्त्रियांच्या अंगावर हा दागिना दिसत असे. ठुशीमध्ये सोन्याचे मणी एकत्र गुंफून ठुशी बनवतात. 

पोहेहार 


पोहेहार म्हणजे सोन्यापासून बनवलेली पोह्यासारख्या दिसणाऱ्या बारीक नक्षीची माळ होय. त्यावरच्या पोह्यासारख्या दिसणाऱ्या बारीक नक्षीमुळे पोहेहार प्रसिद्ध आहे. सोन्याचा पोहेहार सध्या लोकनृत्यासाठी वापरला जातो. 

लक्ष्मीहार
 

लक्ष्मीहार हा एक प्राचीन काळापासून वापरला जाणारा प्रकार आहे. गोलाकार चपट्या मण्यांवर लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असते. भरजरी साडीवर लक्ष्मीहार उठून दिसतो. काळानुरूप लक्ष्मीहारामध्ये देखील थोडे बदल झालेले आहेत. लक्ष्मीहार बनवताना पेंडंटदेखील वापरले जाऊ लागले आहे.  
Previous Post Next Post