आपल्या साड्यांच्या संग्रहात एक तरी पैठणी असावी असं प्रत्येकीलाच वाटतं. याच कारण म्हणजे या साडीवर असणारी बुट्ट्या आणि मोरांची मनमोहक नक्षी. हे सुंदर आणि नाजूक नक्षीकाम आपल्या मनाला भुरळ पाडतं. सर्वांत आधी पैठण आणि त्यानंतर येवला येथे पैठणी बनवण्यास सुरुवात झाली. पेशवेकालीन स्त्रियांना या साड्या फार प्रिय होत्या. त्याकाळी पैठणीवर जरीकाम करण्यासाठी खऱ्या सोन्याच्या तारा वापरल्या जायच्या. पण आता कमी किमतीत साडी बसवण्यासाठी चांदीच्या तारा वापरल्या जातात.
साडीचा काठ, पदर आणि बुट्टे यामध्ये जरीकाम केलं जातं. सामान्यतः साडीचा काठ आणि पदर एका रंगाचा, तर साडीचा अंग त्याला पूरक रंगाचं बनवलेलं असतं. अबोली, मोरपंखी, मोतिया, वांगी (जांभळी) ही विविधरंगी पैठण्यांची स्थानिक नावं आहेत.
आजकाल लग्नसमारंभात वजनदार घागरे घालण्याची व साड्या नेसण्याची इच्छा कोणालाच नसते. अशा वेळी आपली मनमोहक पैठणी तुम्हाला नक्कीच 'राजेशाही लुक' मिळवून देईल. पैठणी ६००० ते १,००,००० पर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहे.