अरे बापरे! सुंदर नक्षीदार कांचीपुरम साड्यांची लाखोंमध्ये असते किंमत, काय आहे विशेष?


साड्या म्हणजे भारतीय महिलांच्या अगदी हृदयाजवळचा विषय असतो. आता जरी सर्वत्र पाश्चिमात्य संस्कृतीच्या कपड्यांचे चलन असले तरीही विशिष्ट प्रसंग आणि कार्यक्रमांच्या वेळी 'साडी' महिलांची पहिली पसंती असते. भारतात वेगवेगळ्या प्रभागांमध्ये साड्यांचे निरनिराळे प्रकार पाहायला मिळतात. जसे की, पैठणी, कांजीवरम, बनारसी, पेशवाई, बांधणी, जरीकाठ इ. या भारतीय बाजारात तुम्हाला स्वस्त ते महागड्या श्रेणीमध्ये साड्या मिळतील. पण काही साड्यांची किंमत तर लाखोंमध्ये देखील जाते. होय, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला कांचीपुरम साड्यांबद्दल माहिती देणार आहोत. तसेच, या साड्यांची किंमत लाखोंमध्ये का असते? याबद्दल देखील आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

कांचीपुरम साडी 

कांचीपुरम साडी महिलांना अतिशय आकर्षक असा लुक देते. कांचीपुरम किंवा कांजीवरम साडी ही तामिळनाडूतील कांचीपुरम येथील एक आलिशान, पारंपारिक दक्षिण भारतीय रेशमी साडी आहे. जी तिच्या समृद्ध पोत, दोलायमान रंग, जड रेशीम, शुद्ध तुतीचा रेशीम आणि गुंतागुंतीच्या सोन्या/चांदीच्या जरीकामासाठी ओळखली जाते. कांचीपुरम साड्या भारतीय कारागिरीचे जिवंत उदाहरण आहेत. या साड्यांमध्ये बहुतेकदा मंदिराच्या बॉर्डर्स, पौराणिक आकृत्या इ. असतात, ज्यामुळे बॉर्डर्स अगदी आकर्षकरित्या ड्रेप होतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ही साडी एक लोकप्रिय वधू आणि समारंभीय पोशाख बनते. 

 म्हणूनच या साड्यांची किंमत कधीकधी लाखो रुपयांपर्यंत देखील असते. या साड्यांमध्ये आणखी काय काय विशेष आहे, ते पाहुयात- 

शुद्ध रेशीम आणि अस्सल जरी 

कांचीपुरम साड्या शुद्ध तुतीच्या रेशमापासून बनवल्या जातात. संपूर्ण साडीमध्ये सोने आणि चांदीच्या जरीचा वापर केला जातो. बहुतेक साड्यांमध्ये बॉर्डर आणि पल्लूवर चांदी आणि सोन्याचा मुलामा असलेले जरीकाम असते.

हाताने केलेले नक्षीकाम 

ज्या साड्यांची किंमत लाखो रुपयांची असते, त्या साड्या हाताने बनवलेल्या असतात. महत्त्वाचे म्हणजे एक साडी हाताने बनवण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. महागड्या साड्यांवरील काम खूप गुंतागुंतीचे असते, त्यामुळे त्या बनवण्यासाठी जास्त कालावधी लागतो.

बॉर्डर, पल्लू आणि बॉडी वेगवेगळे विणले जातात. 

होय, कांचीपुरम साडीची बॉर्डर, बॉडी आणि पल्लू वेगवेगळे विणले जातात. त्यानंतर साडीचे सर्व भाग 'कोरवाई' विणकाम वापरून जोडली जाते. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे साडी फाटली तरीही शिवण कधीही तुटत नाही.

मंदिरे आणि निसर्गापासून प्रेरणादायी डिझाइन्स 

 कांचीपुरम साड्या त्यावरील आकर्षक नक्षीकामासाठी देखील प्रसिद्ध आहेत. साड्यांचे डिझाइन दक्षिण भारतीय मंदिरे, गुहा आणि निसर्गातील शिल्पांपासून प्रेरित असतात. लक्षात घ्या की, प्रत्येक पॅटर्नचे स्वतःचे सांस्कृतिक महत्त्व आणि अर्थ आहे.

वारसा 

 कांचीपुरम साडी हा केवळ कपड्यांचा तुकडा नाही, तर तो एक वारसा आहे. दक्षिण भारतात लग्नाची साडी म्हणून तिचे विशेष स्थान आहे. होय, अनेक कुटुंबांमध्ये ही साडी पिढ्यानपिढ्या जतन केलेली आहे.

Image credit: getty images, google