सतत स्क्रीनसमोर काम आणि ताणतणावामध्ये तरुणाईमध्ये मायग्रेनची समस्या वाढत चालली आहे. मायग्रेनमध्ये डोकेदुखीचा त्रास होतोत. ही अशी वेदना आहे, ज्यामुळे डोक्याच्या एका भागात धडधडत असल्यासारखे वाटते. एवढेच नाही तर, कधी-कधी वेदना अधिक तीव्र झाल्यामुळे असह्य असे होते. मायग्रेन ही फक्त डोकेदुखी नाही; ती मज्जासंस्थेची समस्या आहे. ताण, झोपेचा अभाव, हार्मोनल बदल, मोबाईल आणि लॅपटॉप स्क्रीनकडे जास्त वेळ पाहणे आणि अनियमित खाण्याच्या सवयी या सर्वांमुळे मायग्रेन होऊ शकतो. मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी लोक सहसा औषधांचा वापर करतात. पण औषधसुद्धा किती खाणार?
चिंता नसावी! पण तुम्हाला माहित आहे का की, फक्त 10 मिनिटांचा व्यायाम मायग्रेनच्या वेदना कमी करू शकतो? पण त्याआधी आपण मायग्रेनबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊयात-
मायग्रेन म्हणजे काय?
मायग्रेन ही नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा मेंदूतील सेरोटोनिनची पातळी कमी होते तेव्हा ट्रायजेमिनल नर्व्हमध्ये व्यत्यय येतो, ज्यामुळे न्यूरोपेप्टाइड्स बाहेर पडतात. यामुळे डोकेदुखी होते. हार्मोनल बदल, ताणतणाव, कमी झोप आणि अस्वस्थ आहार देखील यासाठी कारणीभूत घटक आहेत. मायग्रेनचा त्रास डोक्याच्या एका विशिष्ट भागात डोळ्यांजवळ किंवा कनपटीजवळ होतो. हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. ही धडधडणारी वेदना आहे, जी काही तास किंवा अनेक दिवसांपर्यंत राहू शकते. मायग्रेनमुळे केवळ वेदनाच होत नाहीत तर चिडचिड, उलट्या आणि तेजस्वी प्रकाशामुळे होणारी चिडचिड देखील होते.
डीप ब्रीदिंग
ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ताबडतोब खाली बसून किमान 2 मिनिटे डीप ब्रीदिंग करावी. यामध्ये चार सेकंद नाकातून श्वास घेणे आणि सहा सेकंद हळूहळू श्वास सोडणे समाविष्ट आहे. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो, ज्यामुळे मज्जासंस्था सामान्य होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, या सरावामुळे मायग्रेन ट्रिगरचा धोका कमी होतो.
नेक स्ट्रेचिंग
नेक स्ट्रेचिंगसाठी तुमचे डोके हळूहळू उजव्या खांद्याकडे झुकवा. आता 10 सेकंद होल्ड करा आणि नंतर डाव्या बाजूला समान प्रक्रिया करा. अशाप्रकारे पुढे आणि मागेदेखील समान प्रक्रिया करा. हे एक्सरसाइज दोन मिनटे करत रहा. यामुळे मानेचा कडकपणा कमी होईल, जो मायग्रेनचे एक प्रमुख कारण आहे आणि तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल.
शोल्डर रोल्स
आता 1 मिनिटासाठी शोल्डर रोल करत रहा. तुमचे खांदे समोरून वर आणि मागे फिरवा, नंतर तेच उलट दिशेने करा. यामुळे खांद्याचा ताण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे डोक्याचा दाब कमी होतो आणि मायग्रेनचे ट्रिगर होण्याची शक्यता कमी होईल.
आय रिलॅक्सेशनसाठी पामिंग
या व्यायामात पामिंग करणे देखील एक महत्त्वाचा भाग आहे. दोन्ही तळवे गरम करण्यासाठी एकमेकांवर रब करा. त्यानंतर, ते तुमच्या बंद डोळ्यांवर हळूवारपणे ठेवा. असे करताना डीप ब्रीदिंग सुरु ठेवा. ही प्रक्रिया 1 मिनिटासाठी सुरु ठेवा. यामुळे स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो, ज्यामुळे मायग्रेन होण्याची शक्यता असते.
कॅट काऊ स्ट्रेच (मार्जरी-बितीलासन)
कॅट काऊ स्ट्रेच करण्यासाठी टेबल पोझमध्ये या आणि श्वास घ्या. तुमची पाठ खाली आणि डोके वर ठेवा. श्वास सोडा, तुमची पाठ गोल करा आणि तुमची हनुवटी आत ठेवा. ही प्रक्रिया 2 मिनिटे करा. या व्यायामामुळे पाठीच्या नसांवरील ताण कमी होतो आणि डोक्यात रक्त प्रवाह सुधारतो.
चाईल्ड पोज (बालासन)
बालासन करण्यासाठी गुडघ्यांवर बसा, पुढे वाकून, कपाळ जमिनीवर ठेवा आणि हात पुढे पसरवा. हे आसन मनाला शांत करते आणि मायग्रेनच्या वेदनांपासून लक्षणीय आराम देते. व्यायामासोबतच भरपूर पाणी प्या आणि भरपूर झोप घ्या.
IMAGE CREDIT: PEXELS