उन्हाळा म्हटल्यावर डोळ्यासमोर एक गोष्ट हमखास येते ती म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीचा 'आंबा'. उन्हाळ्यात आंब्याच्या वेगवेगळ्या डिशेस आणि स्वीट्स बनविले जातात. आमरस, कैरीचे पन्हे, आम्रखंड, आंबा-बर्फी, मँगो आईसक्रिम, मँगो केक, मँगो मिल्कशेक इ. डिशेस बनविल्या जातात. या सर्व डिशेसचे नाव ऐकून तुमच्या तोंडाला नक्की पाणी आले असणार... पण आम्ही आज तुम्हाला अजून एका आंब्याच्या पदार्थाबद्दल सांगणार आहोत, तो पदार्थ म्हणजे 'आंब्याचे पोहे'. आम्हाला माहितीये तुमच्यातील फक्त काहीच लोकांना याबद्दल माहिती असेल. काही व्यक्तींना वाटत असेल हे काय बाबा नवीन? चला तर मग जाणून घेऊयात या पदार्थाबद्दल...
साहित्य:
२ वाट्या पोहे, ३ वाट्या नारळाचं घट्ट दूध, ३ वाट्या हापूस आंब्याच्या फोडी, पाऊण वाटी पिठी साखर, वेलदोड्याची पूड.
कृती:
पोहे भिजवून घ्यावे. २ वाट्या हापूस आंब्याच्या फोडी मिक्सरमधून हलक्या फिरवून घ्याव्यात. नारळाच्या घट्ट दुधात पिठीसाखर, आंब्याचा हलका फिरवलेला रस व वेलदोडा पूड घालावी. त्यामध्ये भिजवलेले पोहे घालून थोडावेळ थंड करण्यासाठी फ्रीझमध्ये ठेवावे. खायला देताना आंब्याच्या फोडी वर घालून डिश सर्व्ह करावी किंवा सुका मेवा आणि इतर गोष्टी घालून आपल्या आवडीनुसार ही डिश गार्निश करून सर्व्ह करावी.