सौंदर्यवृद्धीमध्ये केसांचे व केशभूषेचे योगदान मोलाचे आहे. उत्तम रीतीने केलेली केशभूषा कोणाचेही रूप बदलवू शकते. पण चांगली हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला आपल्या केसांची संपूर्ण माहिती हवी, केस सरळ आहेत का कुरळे?, त्यांचा रंग कसा?, लहान आहेत की लांब?, त्याच प्रमाणे शरीराचा आकार, चेहऱ्याची ठेवण, मानेची लांबी माहित असणे आवश्यक आहे.
वर्किंग वूमन्सने केस शक्यतो लहानच ठेवावेत. कारण अंबाडा किंवा वेणी घालण्यात खूप वेळ जातो. त्यापेक्षा छोटे केस धुवायला आणि वाळवायला सोपे पडतात. जर शरीरयष्टी प्रमाणबद्ध असेल तर केस खांद्यापर्यंत लांब असू द्या. गोल चेहरा थोडा उभट दिसावा म्हणून हाय पोनी बांधावी . त्रिकोणी चेहरा असणाऱ्यांनी एका बाजूलाच भांग पाडावा. ज्यामुळे त्यांचा चेहरा थोडा उंच दिसेल. अंडाकृती चेहरा असणाऱ्यांना कोणतीही हेअरस्टाईल शोभून दिसते.
-जर कपाळ अरुंद असेल तर माथ्यावरील केसांचा पफ बनवा. त्यानंतर दोन्ही बाजूंचे केस बॅककोम्बिंग करून वर बांधा.
- कपाळ रुंद आणि हनुवटी टोकदार असेल तर हेअरस्टाईल करताना नेहमी मध्ये भांग पाडा.
-जर नाक चपटं असेल तर लहान केस ठेवा. कान मोठे असतील तर कानावरून केस घेऊन ते बांधा.
-चेहरा चौकोनी असेल तर मागेपर्यंत भांग न पाडता लहान भांग ठेवा. या लोकांनी स्टेप कट करावी मध्ये भांग पाडून हाय पोनी बांधावी.
- कपाळ उंच असेल तर कपाळावर येतील असे केस कापावे. मान उंच असेल तर केस मोकळे सोडा किंवा सैलसर बांधा. बुटकी मान असणाऱ्यांनी केस उंच बांधा.
हेअरस्टाईल कशी असावी?
चौकोनी चेहरा:
अशा प्रकारच्या चेहऱ्यामध्ये जबडा टोकदार असतो. केसांच्या बटा चेहऱ्यावर लहरतील अशी कोणतीही हेअरस्टाईल शोभून दिसते. डीप स्टेप कट किंवा फक्त पुढील केसांच्या स्टेप्स कापलेल्या शोभून दिसतात.
उभट चेहरा:
चेहरा उभट असेल आणि गाल आत गेलेले असतील तर गालांवर रुळतील अशा बटा सोडाव्यात. ज्यामुळे गाल झाकले जातील. माथ्यावर छान फुगीर पफ बनवलेला देखील शोभून दिसतो. एका बाजूला भांग पाडा व केस थोडे फुगवून मागे बांधा, ज्यामुळे तुमचा चेहरा आकर्षक दिसेल.
त्रिकोणी चेहरा:
फुगीर गाल, जाड भोवया व टोकदार हनुवटी असलेल्या चेहऱ्याला त्रिकोणी चेहरा म्हणतात. असा चेहरा असणाऱ्यांनी नेहमी एका बाजूला भांग पाडावा.
अंडाकृती चेहरा:
अंडाकृती चेहऱ्यावर कोणतीही हेअरस्टाईल शोभून दिसते. पण खांद्यापर्यंत कापलेले केस या चेहऱ्यावर विशेष खुलून दिसतात.
फुगीर चेहरा:
या चेहऱ्यावर सुद्धा सर्व प्रकारच्या हेअर स्टाईल छान दिसतात. केसांची लांबी हनुवटी खाली दोन इंच असावी.