बऱ्याचदा आपल्याला आवडणारे कपडे घेतल्यानंतर आपल्या अंगावर शोभून दिसत नाही. त्याला बरीच कारणे असतात. कुणाच्या अंगकाठीला कपड्याचा पॅटर्न शोभणारा नसतो तर कुणाच्या वर्णाला कपड्याचा रंग शोभणारा नसतो इ. आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांसोबतच योग्य पोशाख महत्वपूर्ण ठरतो. आपली शरीरयष्टी, रंग, वय आणि प्रसंग त्याला अनुरूप असा पोशाख तुम्हाला अधिकच आकर्षक बनवतो. म्हणूनच स्वतःसाठी योग्य पोशाखाची निवड करताना काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. चला तर मग जाणून घेऊयात योग्य पोशाख निवडण्यासाठीचे खास टिप्स...
- स्वतःसाठी कपडे निवडताना तुमचा वर्ण कसा आहे, त्याला कोणता रंग जास्त शोभेल ते काळजीपूर्वक ठरवा.
- गोऱ्या रंगावर कोणताही रंग शोभून दिसतो, पण जर तुम्ही सावळ्या वर्णाचे असाल तर शक्यतो फिक्कट रंगाचे कपडे वापरा. पूर्ण श्वेत, ग्रे किंवा निळा रंगदेखील तुम्हाला शोभून दिसेल.
- गव्हाळ रंगावर गडद आणि फिक्कट दोन्ही रंग छान दिसतात.
- छोटी चण असणाऱ्या स्त्रियांनी नाजूक प्रिंट किंवा खडीवाले कपडे वापरावेत. अशा स्त्रियांनी ढिले कपडे न वापरता नेहमी फिटिंगचे कपडे वापरावेत.
- उंच स्त्रियांनी मोठे रेघारेघांचे प्रिंट असणारे कपडे घालावेत. त्याचप्रमाणे फिक्कट रंगाच्या पोशाखात तुमची उंच सामान्य दिसेल.
- ज्या स्त्रिया जाड आहेत त्यांनी सैल, मोठे प्रिंटवाले किंवा मोठे चेक्स असणारे कपडे वापरू नयेत. त्यामुळे त्या आणखी जाड दिसतात. अशा स्त्रियांनी नाजूक प्रिंट असणारे कपडे वापरावेत. जर साडी नेसत असाल तर शिफॉन, नायलॉन किंवा कोटा प्रकारच्या साड्या नेसा.
- तुम्ही पाश्चिमात्य पोशाख वापरत असाल तर खास काळजी घ्या. नेहमी टाचेपर्यंत येईल अशी पॅन्ट वापरा.
- कंबर बारीक असेल तर लांब टॉप आणि लहान स्कर्ट घाला.
- व्ही नेक असणाऱ्या टॉपमध्ये तुमची मान अधिक उंच आणि आकर्षक दिसेल.
- तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक दिसण्यासाठी कपडे आणि फूटवेअर यांची रंग सेम/ कॉन्ट्रास्ट मिळतेजुळते असावेत.
- जर तुमची वक्षस्थळ लहान असतील तर प्लेटवाले कुर्ते आणि सलवार किंवा 'ए' लाईन असे कपडे वापरा.
- वक्षस्थळ जर मोठी असतील तर गडद रंगाचे आणि फिटिंगवाले कपडे वापरा.
- जर तुमचे पाय उंचीला कमी असतील तर सलवार आणि चुडीदार किंवा लेगिनसोबत लांब कुर्ता वापरा. छोटा स्कर्ट आणि लांब जॅकेट वापरा. शक्यतो एकाच रंगाचे कपडे वापरा जेणेकरून तुमची उंची जास्त दिसेल. तुम्ही गुडघ्यापर्यंत असलेले शॉर्ट वन पिसदेखील वापरू शकता. उंच टाचेचे (हाय हिल्स) चप्पल वापरा.
- जर तुम्ही उंच आणि जाड असाल तर काळे, मरून रंगाचे कपडे वापरा ज्यामुळे तुम्ही बारीक दिसाल. लायनिंगवाले ड्रेस किंवा टाईट टी-शर्ट, टी-शर्ट वापरू नका. पण जास्त ढिले टॉपदेखील घालू नका. मोठी प्रिंट असणारे कपडे किंवा अंगाला चिकटून बसणारे कपडे वापरू नका.
- नितंबाचा आकार मोठा असेल तर नितंब झाकले जातील असे टॉप घाला. कधीही टॉप किंवा शर्ट इन करू नका.