जाणून घ्या, घरच्या घरी मॅनिक्युअर करण्याची योग्य पद्धत...

सुंदर दिसण्यासाठी संपूर्ण शरीराची देखभाल करण्याची गरज आहे, केवळ चेहऱ्याची देखभाल करणे पुरेसे नसते. तुमचं व्यक्तिमत्व सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराची निगा राखणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसेल. या लेखात आम्ही तुम्हाला मॅनिक्युअर करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल माहिती देणार आहोत. मॅनिक्युअरसाठी पार्लरमध्ये अतिरिक्त पैसे खर्च करायचे नसतील तर  हा लेख पूर्ण वाचा. यामुळे तुमच्या  हातांचे सौंदर्य तर वाढेलच मात्र पैशांची बचतसुद्धा होईल. 

मॅनिक्युअर ही हातांची काळजी घेण्याची एक उत्तम पद्धत आहे. चला तर मग जाणून घेऊयात मॅनिक्युअर करण्याबद्दल संपूर्ण माहिती...

- सर्वप्रथम चांगल्या प्रतीच्या नेलपेंट रिमूव्हरने नेलपेंट काढा. 

- नेल फाईलरने नखांना आपल्या आवडीचा आकार द्या, जसे की गोल, चौकोन किंवा ओव्हल. नेहमी लक्षात ठेवा की, फाईलर हलक्या हातांनी  एकाच दिशेने वापरा. 

-  नखांवर आणि आजूबाजूच्या चारी कोपऱ्यांवर क्युटिकल क्रीम लावा. 

- कोमट पाण्यामध्ये थोडासा लिक्विड सोप किंवा शाम्पू घाला आणि त्यामध्ये आपले हात ५ मिनटे बुडवून ठेवा. 

- ऑरेंज स्टिकच्या मदतीने नखांच्या वर आलेली त्वचा हळूहळू मागे ढकला. यामुळे फक्त मृत त्वचा निघून जाईल आणि नखांना योग्य  तो आकार प्राप्त होईल. 

- हॅन्ड लोशन आणि क्रीमने हाताला मालिश करा. 

- ब्रशने नखं स्वच्छ करा. कोमट केलेल्या बदाम तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये नखं थोडा वेळ बुडवा. 

- कापसाच्या बोळाने नखं व त्याच्या आसपासचा भाग पुसून घ्या. 


- यानंतर नेलपॉलिश लावा. जर नखं सुंदर दिसण्याबरोबर सुरक्षित राहायला हवी असतील तर प्रथम नखांना बेस कोट लावा. हा ट्रान्सपरंट असून त्याचा एक कोट नखांवर लावा. सुकल्यावर आपल्या आवडीचे नेलपॉलिश लावा.   नेल पॉलिश लावताना प्रथम ब्रशने एक लाईन नखांच्या मध्यभागी लावा. नंतर आसपासच्या भागात काळजीपूर्वक एक एक लाईन लावा. यामुळे नखं लांब दिसतात व नेलपॉलिश आजूबाजूच्या कोपऱ्यात पसरत नाही. 

- नेल पॉलिशचा पहिला कोट वाळल्यावरच दुसरा लावा. 

- आठवड्यातून एकदा तरी मॅनिक्युअर करा. मात्र दररोज नखांना क्युटिकल क्रीमने किंवा हॅन्ड लोशनने मालिश करा. 

 घरी मॅनिक्युअर करताना तुम्हाला काही समस्या येत असल्यास अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनामध्ये ही प्रक्रिया करावी.   

Previous Post Next Post