आजकाल केस पांढरे आहेत म्हणून कलर केले जातातच, पण ग्रे, गोल्डन, ब्राऊन, ब्रॉन्झ शेडमध्ये केस रंगवणे ही फॅशन आहे. हेअर कलरचे तीन मुख्य प्रकार आहेत- टेम्पररी डाय, सेमी पर्मनंट डाय आणि पर्मनंट डाय. टेम्पररी डाय अस्थिर असून तो शाम्पू करेपर्यंत टिकतो. सेमी पर्मनंट डाय चार ते सहा आठ्वड्यापर्यंत टिकतो. तर पर्मनंट डाय दीर्घकाळापर्यंत टिकतो. भारतामध्ये जास्त प्रमाणात सेमी पर्मनंट डाय वापरला जातो. पण केस कलर करण्यापूर्वी काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात या महत्त्वाच्या बाबी...
- केस कलर करण्याआधी आपल्या केसांच्या संरचनेची पूर्ण माहिती घ्या. कलरची ऍलर्जी नाही ना हे तपासण्यासाठी पॅच टेस्ट करा.
- आपले व्यक्तिमत्व, वय, चेहरा आणि व्यवसायाला शोभेल अशी शेड निवडा.
- एकाच रंगाचे केस रंगवण्यापेक्षा तुम्ही फक्त काही केसांच्या बटाच रंगवू शकता, याला 'हायलाईट' करणे म्हणतात. टेम्पररी डायचा वापर करून तुम्ही पार्टी पुरता एक हटके लुक मिळवू शकता.
- गव्हाळ रंग तसेच, मॅच्युअर व्यक्तिमत्वावर ब्राऊन किंवा नैसर्गिक काळा रंग शोभून दिसतो. सावळ्या रंगावर काळे केस छान दिसतात. तर गोऱ्या रंगावर सोनेरी किंवा ब्रॉन्झ रंग खुलून दिसतात.
- कलर केलेल्या केसांना चमकदार बनवण्यासाठी कलर ग्लॉसचा वापर करा.
- केस जर कोरडे आणि निस्तेज असतील तर प्रोटीन ट्रीटमेंट, हेअर मास्क किंवा कंडिशनरचा वापर करा.
- पर्मनंट कलर करायचा असल्यास तज्ज्ञ ब्युटिशियनची मदत घ्या.
- केसगळती किंवा कोंड्यासारख्या समस्या असतील तर हेअर कलर करू नका.
- दमा किंवा श्वसनाचे आजार असणाऱ्यांनी हेअर कलर करणे टाळावे.