मैत्रिणींनो! सौभाग्याचे प्रतीक असलेल्या मंगळसूत्राबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का?..

'मंगळसूत्र' हे शब्द ऐकलं तर डोळ्यासमोर पहिली येणारी आकृती म्हणजे नववधू/ विवाहित स्त्री.  मंगळसूत्र घातलेली स्त्री दिसली म्हणजे ती स्त्री विवाहित आहे, हे कळून येते. खोडकर भाषेत मंगळसूत्र म्हणजे विवाहित 'स्त्री'साठी ती विवाहित असल्याचे 'लायसेन्स' असते. विवाहित स्त्रिया या दागिन्याला आपल्या प्राणापेक्षा जास्त जपून ठेवतात. मात्र मंगळसूत्राबद्दल अधिक माहिती ही प्रत्येकाला माहित असेलचं असे नाही. चला तर एक छोटासा परिचय करूयात सौभाग्याचं प्रतीक असलेल्या या दागिन्यासोबत... 

मंगळसूत्र हा विवाहित स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दागिना आहे. महाराष्ट्रात मंगळसूत्राला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक विवाहित स्त्री हा दागिना न चुकता दररोज घालत असते. नववधूच्या दागिन्यांची खरेदी ही मंगळसूत्राशिवाय अपूर्ण आहे. 

मंगळसुत्राचे वेगळेपण म्हणजे त्यात असणारे काळे मणी आणि दोन वाट्या. काळ्या मण्यांना सोन्याचांदीनं मढवून मंगळसूत्र बनवलं जातं. त्यामध्ये असणाऱ्या दोन वाट्या या सासर आणि माहेरच्या घराचं प्रतीक असतात. लग्नामध्ये या दोन वाट्यांमध्ये हळद- कुंकू भरून मंगळसूत्राची पूजा केली जाते. नंतर वर आपल्या वधूला ते मंगळसूत्र घालतो. 

नववधू मंगळसुत्राच्या वाट्या उलट्या दिसतील अशा पद्धतीने ते  घालते. लग्न झाल्यापासून सोळाव्या दिवशी किंवा एक वर्षांनी या वाट्या सुलट्या केल्या जातात. आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरदार महिलांनी रोज मोठं मंगळसूत्र घालून प्रवास करणं शक्य नसतं. म्हणूनच मंगळसूत्रामध्ये लांबीला कमी आणि वजनाला हलकी असणारी डिझाइन्स दैनंदिन वापरासाठी घेतली जातात. 


Previous Post Next Post