Summer Hair Care: उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? हेयरफॉल टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स



ग्रीष्म ऋतू सुरु असून सर्वत्र भयंकर गर्मी सुरु आहे. उन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच, कडक ऊन, दमटपणा आणि घामामुळे आपली टाळू चिकट आणि अस्वच्छ होते. दुपारपर्यंत टाळू जड आणि तेलकट वाटू लागते, ज्यामुळे बहुतेक लोक विशेषतः मुले दररोज शॅम्पू वापरू लागतात. पण रोज केस धुणे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे का? तज्ञांच्या मते, उन्हाळ्यात केस धुण्याची वारंवारता पूर्णपणे तुमच्या केसांच्या प्रकारावर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. विचार न करता वारंवार केस धुतल्याने टाळूतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात व तुटतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावे? 

Also Read: Facial Hair Removal: चेहऱ्यावर शेव्हिंग करत असाल तर महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा...

केसांच्या प्रकारानुसार म्हणजेच हेयर टाइपनुसार केस धुवा. 

जेव्हा त्वचारोगतज्ञ आणि केसांचे तज्ञ केस धुण्याच्या वारंवारतेबद्दल बोलतात, तेव्हा त्यांचा साधा अर्थ शाम्पू वापरून टाळू स्वच्छ करणे असा असतो. फक्त साध्या पाण्याने केस ओले करणे याला केस धुणे किंवा डोके धुणे मानले जात नाही, कारण पाणी टाळूवर साचलेले तेल आणि घाण पूर्णपणे स्वच्छ करू शकत नाही. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन ॲकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, केस धुण्यासाठी असा कोणताही एक निश्चित नियम नाही जो प्रत्येकाला लागू होईल. 

ज्या लोकांचे केस खूप पातळ आहेत किंवा ज्यांची टाळू तेलकट आहे, त्यांनी उन्हाळ्यात एक दिवसाआड किंवा गरज भासल्यास दररोज सौम्य शाम्पूने केस धुवावेत. कारण घाम आणि तेलामुळे त्वचेचे पोअर्स बंद होतात. तसेच, दुसऱ्या रिपोर्टनुसार, जाड किंवा कुरळे केस असलेल्या लोकांनी दररोज शॅम्पू लावणे टाळावे. कुरळ्या केसांमधील नैसर्गिक तेल (सेबम) केसांच्या मुळांपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागतो, म्हणून त्यांनी आठवड्यातून एक किंवा दोनदा शाम्पू करावे. 


व्यायाम करून घाम आल्यानंतर काय करावे?

जर तुम्ही दररोज जोरदार व्यायाम करत असाल किंवा उन्हात जास्त वेळ घालवत असाल, तर तुमच्या टाळूवर घाम जमा होणे स्वाभाविक आहे. तज्ज्ञांच्या मते, टाळूवर घाम जास्त वेळ तसाच ठेवणे योग्य नाही, कारण त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि कोंडा होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे केस गळती सुरू होते. पण प्रत्येक वेळी घाम आल्यावर शॅम्पू लावणे हा त्यावर उपाय नाही. तज्ञांच्या मते, व्यायामानंतर फक्त स्वच्छ पाण्याने टाळू पूर्णपणे धुवावी. यामुळे केस कोरडे न होता घाम निघून जातो. तसेच, नेहमी शाम्पू टाळूला लावा आणि कंडिशनर फक्त केसांच्या लांबीवर लावा.

टीप: वरील माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.