Menopause: मेनोपॉज फेज सुरु असताना महिलांमध्ये काय घडते? त्यानंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी?



मेनोपॉज म्हणजेच मराठीत आपण याला रजोनिवृत्ती असे संबोधतो. रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची थांबण्याची वेळ असते. बरेच लोक याला केवळ एक शेवट मानतात, पण खरं तर ही त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची सुरुवात असते. याची कारणे आणि उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हे स्पष्ट आहे की, रजोनिवृत्तीनंतर आपल्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेण्याची गरज असते. असे म्हटले जाते की रजोनिवृत्ती वयाच्या 50 वर्षांनंतर येते. 

Also Read: दररोज सनस्क्रीन लावल्यानंतरही होते टॅनिंग? नक्की काय आहे कारण

अनेक महिलांना असे वाटते की, रजोनिवृत्तीनंतर त्यांना स्त्रीरोगतज्ञाकडे जाण्याची गरज नाही. पण खरं तर तज्ज्ञांच्या मते, रजोनिवृत्तीनंतर प्रत्येक महिलेने वर्षातून किमान एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. या काळात हाडांची मजबुती, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची पातळी, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल तपासले पाहिजे. नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देखील दिला जातो.

हाडे आणि हृदयाकडे लक्ष द्या. 

TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञ सांगतात की, रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. हे संप्रेरक हाडे आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. या घटीमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात आणि हृदयविकाराचा धोका देखील वाढू शकतो. 

काळजी घ्या. 

- रजोनिवृत्तीनंतर, योनीमार्गातील कोरडेपणा, लघवीच्या समस्या, हसताना किंवा खोकताना लघवी गळणे आणि लैंगिक संबंधावेळी वेदना होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

- या समस्यांपासून आराम देण्यासाठी योनीमार्गातील ओलावा टिकवणारी औषधे आणि विशेष औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे, गप्प राहून त्रास सहन करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे.

हार्मोन थेरपीबद्दल माहिती 

काही महिलांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी HRT दिली जाते, परंतु ती प्रत्येकासाठी योग्य नसते, असे देखील सांगितले आहे. हे थेरपी सुरू करण्यापूर्वी, डॉक्टर महिलेच्या एकूण आरोग्याचे आणि धोक्यांचे मूल्यांकन करतात. जरी HRT घेणे शक्य नसले तरी, हॉट फ्लॅशेससारखी लक्षणे कमी केली जाऊ शकतात. यासाठी चांगली झोप घ्या, तुमची रूम थंड ठेवा, रात्री हेवी मील करू नका, चहा आणि कॉफी कमी प्या, दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.

तुमच्या मेंटल हेल्थची देखील काळजी घ्या. 

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात होणारे बदल स्त्रीच्या मनःस्थितीवर आणि भावनांवरही परिणाम करू शकतात. या काळात कुटुंबाचा आधार आणि योग्य सल्ला खूप उपयुक्त ठरतो. 

तसेच, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, रजोनिवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसून, एक नवीन अध्याय होय. नियमित आरोग्य तपासणी, निरोगी जीवनशैली आणि योग्य काळजी घेतल्यास हा काळ आरोग्यपूर्ण आणि आनंदी होईल. 

image credit: pexels