जाणून घ्या, सनस्क्रीन लोशन कसे निवडावे? आणि सनस्क्रीन वापरताना घ्यावयाची काळजी...

 


बरेचदा आपल्याला कामासाठी किंवा ट्रिपसाठी उन्हात फिरावं लागतं. पण उन्हामध्ये असणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचा लाल होणे, त्वचेची जळजळ होणे, चट्टे उमटणे किंवा खाज येणे अशाप्रकारच्या समस्या होतात. यांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठीच सनस्क्रीन लोशनचा वापर करतात.  

सनस्क्रीन लोशनला सनब्लॉक, सनबर्न किंवा सनटॅन क्रीमदेखील म्हणतात. या क्रीममध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचेचं उन्हामध्ये होणाऱ्या वरील समस्यांपासून रक्षण होते. कधीही सनस्क्रीन लोशन निवडताना आपल्या त्वचेचा प्रकार लक्षात घ्यावा. 

तेलकट त्वचा-  उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचा अधिकच तेलकट होते. म्हणून शक्यतो जेल फॉर्ममध्ये असणारं किंवा वॉटरबेस असणार सनस्क्रीन निवडा. 

सामान्य त्वचा-  या प्रकारच्या त्वचेसाठी लोशन स्वरूपातील सनस्क्रीन जास्त उपयुक्त ठरेल. लोशनमुळे त्वचेमध्ये पुरेसा ओलावा टिकून राहतो.

कोरडी त्वचा- कोरड्या त्वचेमध्ये सीबमचं प्रमाण कमी असल्याने ती खूप नाजूक असते. अशी त्वचा असणाऱ्या लोकांनी मॉइश्चराइजिंग सनक्रीन वापरावे. 

सनस्क्रीन निवडताना त्यातील घटक नक्की तपासावे. झिंक आणि टिटॅनियम ऑक्साईड असणारे सनस्क्रीन दीर्घकाळापर्यंत त्वचेचे उन्हामध्ये होणाऱ्या समस्यांपासून रक्षण करते. आजकाल वाईप्स किंवा पावडर स्वरूपातदेखील सनब्लॉक उपलब्ध आहेत. फाउंडेशन, कॉम्पॅकट पावडर, ब्रॉन्झर्स आणि लिपबाम सारख्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये काही अंशी SPF (SUN PROTECTING FACTOR) असतो. 

सनस्क्रीन कसे वापरावे? 

उन्हामध्ये बाहेर पडण्यापूर्वी १५ -२० मिनिट आधी सनस्क्रीन लावा. शरीराचा जो भाग उघड राहणार आहे, जसे की हात, गळा, चेहरा, मान, पाठ यांवर देखील सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन लावल्यावर त्वचेमध्ये मुरण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, तरच UV Rays पासून तुमच्या त्वचेचं रक्षण होईल. भरपूर वेळ उन्हामध्ये वावरायचे असेल तर दर दोन तासांनी सनस्क्रीन लावावे. 

SPF ( Sun Protecting Factor)

 जर तुमच्या सनस्क्रीनमध्ये SPF असेल तर  त्याचा अर्थ असा की, तुमची त्वचा उन्हामध्ये बाहेर पडल्यावर १० मिनिट सुरक्षित राहणार होती, तिला आता २०० मिनिटांचं संरक्षण मिळेल. त्वचा तज्ज्ञांच्या मते, भारतीय त्वचेसाठी SPS15 ते  SPF30++ असणारे सनस्क्रीन जास्त उपयुक्त ठरतो. पण जर तुम्ही सेल्सगर्ल अभिनेत्री यांसारख्या व्यवसायात असाल तर तुम्हाला उन्हामध्ये अधिक काळ राहावं लागतं. अशा वेळी SPF50++ असणारे सनस्क्रीन वापरा.


 

सनस्क्रीन वापरताना घ्यावयाची काळजी- 

- एक्सपायरी  डेट उलटून गेलेली सनस्क्रीन कधीही वापरू नका. बऱ्याचदा आपण आदल्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आणलेलं सनस्क्रीनच वापरतो, पण जर क्रीमची एक्सपायरी डेट उलटून गेली असले तर त्याचा वापर करणे टाळा. 

- जर तुम्ही तुमचे सनब्लॉक चुकून गरम जागी ठेवले असेल तर ते वापरू नका. कारण उष्णतेशी संबंध आलेले सनस्क्रीनमधील घटक तुमच्या त्वचेचे नुकसान करतात. 

- सनस्क्रीनचा वापर नियमित करायला हवा, अगदी पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये पण करावा. कारण हिवाळा असो व पावसाळा आपली त्वचा कमी-अधिक प्रमाणात अतिनील किरणांच्या संपर्कात कायम असते आणि सनस्क्रीन त्यापासून आपल्या त्वचेचे बचाव करते. 

- आपली त्वचा मॉइश्चरायझरप्रमाणे सनस्क्रीन शोषूण घेते. म्हणूनच खूप काळ उन्हामध्ये राहावयाचे असल्यास काही तासांच्या अंतराने  पुन्हा सनस्क्रीन लावा. 

- तुम्ही ऑफिस, घर किंवा कारसारख्या बंदिस्त ठिकाणी असलात तर तुमचा संपर्क अतिनील किरणांशी येतो. ऑफिसमध्ये वापरले जाणारे फ्लुअरेसंट लाईटदेखील अतिनील किरणे उत्सर्जित करत असतात. म्हणूनच सनस्क्रीनचा वापर करावा. 

 

Previous Post Next Post