कुडी:
जास्त कलाकुसर नसलेला, पण सुंदर असा हा दागिना आहे. पेशव्यांच्या काळापासून कुडी हा प्रकार प्रसिद्ध झाला. त्या काळच्या स्त्रिया नऊवारी साड्या नेसत आणि त्यावर कुडी आवर्जून घालत रोजच्या वापरासाठी मोत्याच्या तर खास कार्यक्रमांसाठी सोन्याच्या कुड्या वापरल्या जात. म्हणून तर आज नऊवारी साडी नेसायची म्हटलं की पहिली आठवण येते ती कुड्यांची.
कान:
हा दागिना संपूर्ण कानाच्या आकाराचा असून पूर्ण कान झाकला जाईल अशा प्रकारे त्याची घडण असते. यामध्ये जास्त करून कोयरीचा आकार प्रसिद्ध आहे, कारण कोयरीचा आकार कानासारखा असतो. सध्या 'जय मल्हार', 'गणपती बाप्पा मोरया', 'स्वामिनी' इ. मालिकांमुळे हा दागिना लोकप्रिय होऊ लागला आहे.
बुगडी:
बुगडी ही पुरुषांच्या भिकबाळीप्रमाणे कानाच्या वरच्या पाळीवर घालतात. बुगडी हा पारंपरिक दागिना असून तो मोती किंवा सोन्यापासून बनवतात. पण आजकाल विविध खडे आणि मोती वापरून कपड्यांना मॅच होतील अशा बुगड्या बनवल्या जातात. छापाच्या बुगड्यादेखील उपलब्ध असल्याने त्या कोणीही वापरू शकतं.
हा कर्णभूषणाचा फार प्राचीन प्रकार आहे. झुब्यांची रचना एखाद्या घुमटाप्रमाणे असते. झुब्यांना झुमकेदेखील म्हणतात.
सोने, चांदी, मोती यांपासून झुबे बनवले जातात. गुजरात, राजस्थानमध्ये पायघोळ घागऱ्यांवर झुबे घातले जातात. काही शास्त्रीय नृत्यप्रकारात देखील झुब्यांचा वापर केला जातो.
वेल:
वेल म्हणजे मोती किंवा सोन्याचा सर होय. ही वेल कानातल्यात अडकवतात तर दुसरे टोक केसांमध्ये अडकवतात. काही वेळा वेल कानावरून घेऊन मागे कानातल्यात अडकवली जाते.